Wednesday 4 August 2021

एक चित्तथरारक प्रेक्षणीय स्थळ मल्हारगड!!पुणे.


ते काय आहे जे मानवाला अनादि काळापासून रमवत आलं आहे? 
ते काय आहे जे मानवाला मोहवत आलं आहे? 
ते काय आहे ज्याचा मानवही एक भाग आहे? 
ते काय आहे ज्याच्या कुशीत मानव विसावत आला आहे? ज्याच्या समीप असताना त्याला जगाचाही विसर पडतो? 
आपल्या अवतीभवती नित्य विराजमान आहे, काय आहे ते? 
काय आहे ते, ज्याची मैत्री निरंतर तुम्हा आम्हा सगळ्यांना हवी-हवीशी वाटते? 
ते काय आहे जे माणसाला माणसाशी जोडून ठेवते? 
ज्याच्या सहवासात स्वत:च्या अस्तित्वाची जाणिव बोथट होते,तरीही जे तुम्हाला तुमची क्षमता काय आहे आणि किती उंची गाठु शकते, याची जाणिव करवून देते. 
Any guesses? 
हो तुम्ही बरोबर आहात!! 
तो निसर्गच आहे जो अनादि काळापासून आपल्या सोबत आहे आणि अनंत काळापर्यंत मानवाच्या सोबत राहील. 
Photo courtesy by Google

तो दैदीप्यमान आहे, तो भव्य आहे, दिव्य आहे, ईश्वराचे सगुण-साकार रूप आहे. 
तो पालनकर्ता आहे, सर्वशक्तिशाली आहे, रौद्र रूप धारण केले तर सर्व संहारक देखिल आहे.
तरीसुद्धा मानवाला त्याची मैत्री, त्याची अविरत माया, जगण्याची, जगवण्यावरची असिम निष्ठा, निसर्गाचं प्रेम
ओढ लावत असते. 
त्याच्या भेटीची अनिवार ऊर्मी मनात रूंजी घालत असते. वा-यासारखं चंचल असणारं मन जे नेहमी, "चिंता वाहतो विश्वाची "या अविर्भावात असते;ते केवळ निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावरच शांत होऊ शकते.
त्या एकाशी (परमात्मा)संधान साधू शकते. 
तल्लीन होऊन तद्रूप होऊ शकते. 
तिथे आपले मी पण लोप पावते. द-या डोंगर चढताना 
पायाखालच्या मातीशी मन एकरूप होते!! 
कारण एक चुकीचे किंवा घसरलेले पाऊल माणसाचा दंभ क्षणात घालवु शकते. 

जिथे केवळ निसर्गाची सत्ता असते, त्याची मर्जी राखुन वागावं लागते, तिथे आपले अस्तित्व  निव्वळ कस्पटासमान असते.
किंबहूना असे असले तरी नव्याने जगण्याचे बळ हा निसर्गच बहाल करतो. चढतांना पडलो तरी पुन्हा उठून चालण्याची प्रेरणाही तोच देत असतो. 
 "पिंडी ते ब्रम्हांडी " या म्हणीप्रमाणे जे निसर्गात आहे ते चेतनातत्व, पांचभौतिक तत्व आपल्या मनात आणि देहात विराजमान आहेच ;पण सांसारिक कर्मकाण्ड करताना याचा कुठेतरी विसर पडतो. म्हणून  निसर्ग त्याची जाणिव करवून देतोच आणि त्याच्या कुशीत शिरायची अनावर ईच्छा मनात जागी होते. 

अशाच एका बंडखोर क्षणी स्वत:ला पुन्हा शोधायला,
निसर्गाच्या मैत्रीचे वृक्षारोपण करायला,त्याच्या सान्निध्यात जायला  मी, माझे कुटुंब आणि ऊत्साहाने  ऊमदे  आमच्या सारखेच आमचे स्नेहीवृंद 
वाघजाई दरा /मल्हारगड (कोळेवाडी) येथे
मैत्रीदिनाच्या दिवशी गिर्यारोहण(Trekking) करायला गेलो. शेवटी काय तर निसर्गाची मैत्री सगळ्यांना हवी-हवीशी असतेच. 
आजपर्यंत माझी भ्रमंती केवळ दर्यापुरतीच (कोकण-सागर) मर्यादित होती. 
गिर्यारोहणाचा माझा पहिलाच अनुभव, त्यामुळे प्रचंड उत्साह ऊतू चालला होता. 
चाळीशीच्या उंबरठ्यावर असताना मला माझी शारिरीक आणि हो मानसिक क्षमता सुद्धा जोखायची होती. 
म्हटले ना की हे तपासायचे असेल तर निसर्गासारखा दुसरा वैद्य नाही... The best!! 
माझ्या मनात चलबिचल होती की, मी करू शकेन का? 
कारण सिहगडाच्या पाय-या चढतानाच माझी दमछाक व्हायची. पण आमच्या चमूमध्ये असणारे सगळ्यात लहान सदस्य आर्या आणि चिन्मय या दोन धिटुकल्यांचा अदम्य आणि अशरण उत्साह पाहूनच आम्हाला चढायचा हुरूप आला. 

The brave climbers duo Arya & Chinmay. 

पाऊस पडून गेल्यामुळे रस्ता चिखलमय झाला होता. आमच्या बुटांचा तर पार रंगच बदलला होता. 
मनात आले की, sports shoes आणायला पाहीजे होते. पण ऐनवेळी ठरलेली आमची ट्रीप त्यामुळे थोडी त्रेधा उडाली इतकेच. 
तुम्ही मात्र नीट तयारीने जा, जर गिर्यारोहणाचा बेत असेल तर. 
डोंगरावर जाण्यासाठीचा अर्धा अधिक रस्ता उंचसखल तर ब-यापैकी सपाट आहे. 
पण वरील फोटो ज्यामध्ये तुम्हाला वाघजाई चा बोर्ड दिसतो तिथून रस्ता  चांगलाच बिकट होत जातो. इतर वेळी खडकावरून चढता आले असते;पण पावसामुळे 
सगळेच निसरडे झाले होते. 
मधुनच पावसाच्या रिमझिम सरी येत होत्या.
रानवारा मधुर शिळ घालत होता, आणि आमच्या तनामनावर रोमांच फुलवित होता!! 

खडकाळ रस्ता..मध्येच भेटलेला millipede. 😅
 
आमचे नेतृत्व करताना-- आर्या

अर्धा डोंगर चढल्यावर तिथे एक पठार लागते. त्या पठारावरून होणारे पूण्य नगरीचे दर्शन म्हणजे डोळ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरते. 
निळ्या नभाची निळाई,
सोबतीने घनश्याम।
सुंदर ती पर्वतरांग, 
घेई मनाचा ठाव।।
हिरवाईने नटलेली वसुंधरा, 
पायी हिरवाकंच गालीचा।
सांग माधवा, 
कसे नं हरपेल भान ।।
अशीच अवस्था झाली होती आम्हा सगळ्यांची. 


     काही क्षणचित्रे.. 
अर्ध्या रस्त्यात लागणारे पठार आणि मागे दिसत असलेले पुणे शहर!!
आता असे विलोभनिय दृष्य क्यामेरात टीपणार नाही तो मनुष्यच विरळा!! 
अजुन बरीच चढाई बाकी होती. 
हा तो डोंगर जो चढणे बाकी होता. 

सोबत आणलेला चहा खुणावत होता, पण "मंजील अभी दुर थी", म्हणून नंतर घ्यायचा असे ठरले. 
चढत असताना काही जागा अशा होत्या की माघार घ्यावी असे वाटले. 
But again thanks to Aarya and her aai baba and kaka. 

त्यांनी आमची हिम्मत खचू दिली नाही. 
कसे चढायचे याचे प्रशिक्षणच एका अर्थी त्यांनी 
आम्हाला दिले. 
एकमेकांना सहाय्य करत आम्ही चढतच गेलो. 

हुश्श!! 
गडावर पोचलो एकदाचे. 
  
गडाच्या माथ्यावर एक पुरातन कालीन खंडोबाचे मंदीर आहे .

मंदीराचे बांधकाम चिरेबंदी आहे. 

शके 1612 चे बांधकाम आहे हे. त्या काळी कसे आणले असतील चिरे एवढ्या वर ते एक आश्चर्यच आहे. मंदीरा 
बाहेर नारळ वाढवायला एक दगड आहे, ज्यावर अनेक
भाविकांनी वाढवलेले नारळ तेथे प्रसाद म्हणून ठेवले होते. 
मंदीराचा गाभारा तिन्ही त्रिकाळ थंडच राहत असावा असे आतला घुमट पाहून वाटले. खंडोबाचे दर्शन झाले आणि असे वाटले की येथे येण्याचे चीज झाले.मनाचा गाभारा त्या देव्हा-यातील तेजापूढे
नतमस्तक झाला.
एक निरव शांतता आणि अस्सिम परमानंद मनात व्यापून उरला!! 
ईथे क्षणचित्र मुद्दाम दिले नाही, कारण तो अनुभव, ते रूप तुम्ही स्वत: पाहावे यातच खरी मजा आहे. 
मंदीराबाहेरचा सर्वदूर परीसर मनावर गारूड करतो. 
 
तेथील एका कड्यावर आम्ही विसावलो. खाली आ वासून बसलेली खोल दरी दरारा निर्माण करत होती;
पण आमच्या मनात एकप्रकारचा ऊन्माद भरला होता, त्यामुळे कुणालाच त्या दरीची तमा नव्हती, नसावी!! मग सोबत आणलेल्या चहाचे पान झाले आणि प्रत्येक गात्रात आलेला शिण कुठल्या कुठे पळाला . 
मंदीराबाहेरची कड्यावरची जागा.. क्षणभर विसावा!! 

तेथून हत्तीच्या आकाराचा हा विस्तीर्ण पर्वत दिसतो.

त्याच्या आकारामुळेच त्याला हत्ती डोंगर हे नाव पडले आहे. तो डोंगर पाहताच आर्याने पुढच्या गिर्यारोहणाची मोहीम आखलीदेखिल!! 
वातावरणात मोरांचा केकारव मधेच गुंजत होता.पण प्रत्यक्ष बघण्याचा योग काही यावेळी आला नाही. कितीतरी वेळ आम्ही ते आरसपानी सौंदर्य न्याहाळत बसलो होतो. प्राणायाम करून तो नैसर्गिक प्राणवायु श्वासात भरभरून घेतला. 
काही काळासाठी का होईना पण corona आणि mask पासून सुटका झाल्याची जाणिव होत होती.

 इतके चढल्यावर आता भुकेची जाणिव होत होती, मग मनाचा हिय्या करून आम्ही खंडोबाचा निरोप घेतला.(भेळीचा समाचार उतरताना घ्यायचा होता ना! )
मनावरचे सगळे ओझे, ताण-तणाव तिथेच मागे टाकून, नविन उत्साहाचा प्रपात अंगोपांगी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.  परतीचा मार्ग वेगळ्या दिशेने आहे. चढाई पेक्षा थोडा सोपा आहे. 

परतीच्या वाटेवर भेळीची मज्जा!! 

सपाटून भूक लागल्यावर खाल्लेला पहीला घास म्हणजे स्वर्गीय आनंद!! ब्रम्हानंद!! परमानंदम्!!
दि 1-8-2021 हा आमच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस आहे. 
जगणे आणि भरभरून जगणे म्हणजे काय याचा अनुभव त्या दिवशी आला होता!! 

त्याकरीता सहलीचे आयोजन व नियोजन कर्ता
श्री अनुप कुलकर्णी त्यांची पत्नी सौ अनुश्री, मुलगी आर्या आणि श्री नरेन्द्र कुलकर्णी यांचे मन:पुर्वक आभार!! 
क्षणचित्र सौजन्यासाठी श्री नरेन्द्र यांचे विशेष आभार!! 
तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या!! 
वाघजाई दरा (मल्हारगड) कोळेवाडी, पूणे. 
श्री स्वामी नारायण मंदीराच्या मागील परीसर!!